
एका शाळेत काम करताना त्या शाळेतल्या काही मुलांची मातृभाषा वेगळी होती. ही भाषा मराठीशी जवळ जाणारी जरी असली तरी त्या भाषेतील शब्द, वाक्यरचना, संकल्पना फार वेगळ्या होत्या. त्यामुळे शाळेत जे विषय मराठी भाषेत शिकवले जात होते, ते समजून घेणे त्यांचासाठी अवघड जात होते. त्यातच आपल्या भाषेविषयीचा न्यूनगंड त्यांचा मनात वाढत चालला होता. अनेक प्रश्न त्यांना पडत होते परंतु ते विचारता येत नव्हते. ही अडचण लक्षात आल्यानंतर आम्ही या मुलांच्या भाषेवर काम करायचं ठरवलं. आधी त्यांचा भाषेबद्दलचा न्यूनगंड काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना जास्तीत जास्त मातृभाषेत बोलण्याच्या संधी दिल्या. हळूहळू त्यांचा भाषेतल्या शब्दांना मराठीमध्ये पर्यायी शब्द काय आहेत हे कळावे यासाठी काही खेळ घेतले. वाक्यरचना करणे, शब्दसाठा वाढवणे, वाचन कौशल्य, संभाषण कौशल्य यासाठीचे अनेक उपक्रम त्यांचाकडून करून घेतले. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढला. मुलं आता प्रश्न विचारू लागली, आपली मते मांडू लागली. आधी शिकलेल्या संकल्पनांवर आधारित नवीन संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागली. आपण मागे पडतोय ही भावना जाऊन नवीन काहीतरी शिकण्याचा उत्साह त्यांचात दिसून आला.
माझी बोली...
