top of page
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
new pattern children with humans.jpg

टिलीमिली  (२०२०)

आपापल्या कामातून कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या स्तरावर मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले गेले. या काळात मुलांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात तसेच ज्यांच्याकडे ऑनलाइन शिकण्याची सुविधा नाही अश्या मुलांसाठी एम. के. सी. एल. के. एफ.ने टिलीमिली  मालिकेची निर्मिती केली आणि सह्याद्री वाहिनीवरून या मालिकेचे प्रसारण करण्यात आले. ही मालिका पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित होती. पहिली ते चौथीच्या एकूण १९२ भागांच्या मालिकेतील ११६ भागांचे स्वार्कच्या सदस्यांनी संहिता लेखन , साधन निर्मिती आणि सादरीकरण केले. उर्वरित भागांचे आशय पुनरावलोकनाचे काम केले. संकल्पना सहजरित्या समजावून देणे हा महत्वाचा भाग होताच परंतु दूरदर्शन हे माध्यम लक्षात घेऊन उपक्रमांची रचना केली. जवळपास २ कोटी मुलांपर्यंत ही मालिका पोहोचली. या उपक्रमासाठी एम. के. सी. एल. चे चीफ मेंटोर डॉ. विवेक सावंत सर, उदय पंचपोर सर, डॉ. रेवती नामजोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी सर यांनीही स्वार्कच्या कामाचे कौतुक केले.

तुकूहल (मे २०१८)

  ‘तुकुहल’ ही स्वार्कची पहिलीच कार्यशाळा. आपण आपल्या शिकण्याची सुरवात स्वतःला समजून घेण्यापासून करतो, त्यामुळे ‘माणूस आणि त्याचं कुतूहल’ हाच कार्यशाळेचा मध्यवर्ती विषय म्हणून निवडला गेला. लहान मुलांना स्वतःविषयी अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे मुले स्वतःहून शोधतात. हाच विचार करून एका वेगळ्या प्रकारे मुलांना उत्तरे शोधण्याची संधी देण्याचा प्रयोग या कार्यशाळेतून करून पाहिला. कार्यशाळेत आलेली मुले एका निर्जन बेटावर अडकली आहेत आणि तिथे येणाऱ्या विविध अडचणी ते सोडवणार आहेत अशी कल्पना मुलांनी कार्यशाळेच्या सुरवातीला केली. नंतर त्या कल्पनेनुसार विविध उपक्रम मुलांनी केले. यात स्वतःच्या प्राथमिक गरजांपासून समाजरचना, नियम, शोध, आपलं शरीर यासारख्या विविध संकल्पनाचा मुलांनी अभ्यास केला.

गोष्टीकोन (नोव्हेंबर २०१८)

  ‘गोष्ट’ साधारणपणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मुलं स्वतःबद्दल, आपल्या सभोवतालाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी रचत असतात. या गोष्टी म्हणजेच मुलांचे पूर्वज्ञान. मुलांना नवीन गोष्टींचा अनुभव देण्यासाठी त्यांचाच गोष्टींचा वापर केला तर शिकणं अधिक मजेदार होते. हा विचार लक्षात घेऊन ‘गोष्टीकोन’ या कार्यशाळेची रचना केली होती. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी या दोन गटांसाठी ही कार्यशाळा घेतली गेली. ‘गोष्ट’ या माध्यमाचे निरनिराळे पैलू मुलांनी अजमावून पहिले. नृत्य, छायाचित्रीकरण, कठपुतळी, नाटक, चित्रकला, कोलाज यासारख्या विविध माध्यमांमधून गोष्टीच्या आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न मुलांनी केला. तसेच गोष्टीच्या आधारे पत्रलेखन, आपल्या आजूबाजूचा परिसर समजून घेणे, घटनाक्रम यासारख्या अभ्यासक्रमातील संकल्पना सुद्धा सहजपणे शिकता येतात हा अनुभव देखील घेतला. असा गोष्टीतून उलगडत गेलेला एकेक कंगोरा प्रत्येक मुलाला स्वतःचा असा एक दृष्टीकोन देऊन गेला, आणि हाच प्रत्येक मुलाने स्वतःसाठी शोधलेला ‘गोष्टीकोन’.

बोलवाणी (नोव्हेंबर २०१९)

 आपली शिकण्याची सुरुवात ही ‘भाषा’ शिकण्यापासून होते. अत्यंत नैसर्गिक पद्धतीने ऐकणे, बोलणे, वाचणे आणि मग लिहिणे अश्या क्रमाने आपण आधी आपल्या घरी आणि नंतर शाळेमध्ये ‘भाषा’ शिकत असतो. मातृभाषेबरोबरच अनेक भाषा मूल शिकत असते. या भाषा का शिकाव्यात? त्या कश्या शिकाव्यात? यासारख्या प्रश्नांच्या भोवती ‘बोलवाणी’ या कार्यशाळेची रचना केली होती. भाषानिर्मितीचा अनुभव घेण्यासाठी कार्यशाळेत मुलांनी एक नवी भाषा तयार केली. बोलणे, वाचणे, लिहिणे ही कौशल्ये विकसित करण्यासाठी काही उपक्रम मुलांनी केले. शालेय अभ्यासक्रमात आपण भाषा शिकतो परंतु त्याचे व्यवहारातील उपयोजन मुलांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाषा ही फक्त परीक्षेसाठी न अभ्यासता त्यातले बारकावे शोधले तर ते शिकणे अधिक मजेदार होते याचा अनुभव मुलांनी घेतला.

चरीघच चळाखे

 कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुलांच्या शाळा बंद झाल्या आणि मुले घराबाहेर देखील पडू शकत नव्हती. तेव्हाच स्वार्कनी ‘चरीघच चळाखे १‘ ही पाहिली online कार्यशाळा घेतली. १४ दिवस चाललेल्या या कार्यशाळेत ७ वेगवेगळे उपक्रम मुलांना दिले गेले. मुलांनी दिलेला उपक्रम २ दिवसात पूर्ण करून स्वार्क ला पाठवयाचा होता. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. यात पाककला, संगीत, वेशभूषा, हस्तकला, जाहिरात तयार करणे यासारखे विविध उपक्रम मुलांनी मोठ्या उत्साहाने केले. मुलांना या अनपेक्षित काळात जास्तीत जास्त व्यस्त ठेवणं आणि त्यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं हा उद्देश या कार्यशाळेने साध्य केला. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या खेळण्यांना अनेक पर्याय आपल्याला घरातच शोधता येऊ शकतात हा विचार पालकांना देखील भावला.   

चरीघच चळाखे २

‘चरीघच चळाखे १’ च्या प्रतिसादानंतर मुलांनी अश्या कार्यशाळेसाठी आग्रह धरला. परंतु यावेळी थोडासा वेगळा विचार करून video conferencing द्वारे कार्यशाळा घेण्याचे ठरवले. नर्सरी ते मोठा गट, पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अश्या तीन गटांमध्ये ही कार्यशाळा घेतली गेली. Video conferencing हे माध्यम मुलांसाठी आणि स्वार्कसाठी सुद्धा नवीन होते. माध्यमाशी सुसंगत, मुलांना घरी बसून करता येतील असे उपक्रम निवडले. मुलांनीही या नवीन माध्यमाशी सहजरित्या जुळवून घेतले. सहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत रोज १ तास मुले ताई - दादांबरोबर video conferencing द्वारे भेटून उपक्रम करायची आणि नंतर ताई - दादा मुलांना घरी करण्यासाठी काही उपक्रम  द्यायचे. या पद्धतीने कार्यशाळेची रचना होती. मुलांची तार्किकता, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, शोधकवृत्ती या पैलूंचा विकास होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले गेले.

चरीघच चळाखे ३

  ‘चरीघच चळाखे’ या मालिकेतील ही तिसरी कार्यशाळा. video conferencing द्वारे झालेल्या या कार्यशाळेमध्ये ‘आपले  शरीर’ हा विषय घेऊन मुलांबरोबर काम केले गेले. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अश्या दोन गटांमध्ये ही कार्यशाळा आयोजित केली होती. आपल्या शरीरातील यंत्रणा, मेंदू, आपल्या हालचालींमधील ताळमेळ, आपलं आरोग्य, आजार यांसारख्या संकल्पना वेगवेगळ्या खेळातून जाणून घ्यायचा मुलांनी प्रयत्न केला..या कार्यशाळेत मुलांना निरीक्षण, वाचन यांसारख्या उपक्रमांमधून स्वतःहून उत्तरे शोधायची होती. त्यामुळे विज्ञान हा विषय शिकण्यासाठी जी आपणहून शिकण्याची आवड निर्माण व्हावी लागते, तशी आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले.

वार्षिक प्रकल्प 

  स्वार्कने आपला पहिला वार्षिक उपक्रम २०१९ मध्ये ज्ञानज्योती विद्यामंदीर, पुणे या शाळेतल्या मुलांबरोबर सुरु केला. इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकणारी १२० मुलं या प्रकल्पामध्ये सहभागी झाली होती. दर आठवड्यातून दोन तास स्वार्कचे ताई दादा मुलांबरोबर काम करायचे. या प्रकल्पाचा मध्यवर्ती विषय ‘पाणी’ असा होता. पाण्याशी निगडीत गणित, विज्ञान, भूगोल, भाषा या विषयांमधल्या वेगवेगळ्या संकल्पना मुलांनी समजून घेतल्या. यासाठी नृत्य, नाट्य, खेळ, प्रयोग, क्षेत्रभेट यांसारख्या माध्यमांचा आधार घेतला गेला. मुलांकडून चर्चेतून आलेले मुद्दे आणि त्यांचा अभ्यासक्रमातील संकल्पना या दोन्हीमध्ये ताळमेळ राखत ‘पाणी’ हा प्रकल्प आकार घेत होता. द्रवस्वरुपातील वस्तुंच मापन, पाण्याचं प्रदूषण, पाण्यावरच्या कविता, पाणी टंचाई, पाणीप्रश्नावर काम करणाऱ्या संस्था, पाणी आणि आपली जवाबदारी यांसारख्या अनेक संकल्पनांवर मुलांनी काम केले.पुण्यातल्या मुठा नदीतल्या प्रदूषणावर काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘river walk’ या उपक्रमात भाग घेतला. नदीच्या जवळून फेरी मारून नदीविषयी माहिती मिळवली. प्रत्यक्ष नदीची परिस्थिती बघितल्यानंतर नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी मुलांनी स्वतः विचार केला आणि त्याबाबतची जबाबदारी सुद्धा त्यांना आपणहून कळली.         

   

शैक्षणिक साधने आणि खेळ

मुलं स्वतःहून शिकू शकतात परंतु त्यांना शिकण्यासाठी योग्य ती शैक्षणिक साधनं आणि खेळ उपलब्ध करून द्यावे लागतात. एखाद्या संकल्पनेची ओळख, त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण, त्याचं उपयोजन,सराव आणि मूल्यमापन अश्या टप्प्यांमध्ये या साधनांची आणि खेळांची रचना असते. त्यामुळे मुलं सोप्प्याकडून अवघाडाकडे अश्या विविध स्तरांवर संकल्पनेचा सराव करु शकतात. ह्या खेळांची रचना करताना मुलांचा स्नायू विकास, sensory engagement, वयानुसार लागू होणारी काठीण्य पातळी या बाबींचा प्रामुख्याने विचार केला जातो. मुलांना कायम कृती करून बघायला आवडतात. त्यामुळे संकल्पना शिकताना जेवढे करून पाहण्याचे उपक्रम जास्त तेवढा मुलांचा शिकण्याचा उत्साह जास्त. प्रत्यक्ष वस्तूंचा वापर आणि खेळात वाढत जाणारी काठीण्यपातळी यामुळे मुलं अधिक एकाग्रतेने हे खेळ खेळतात. खेळातील आव्हानं पार करत असताना संकल्पनेतील काठीण्यपातळीची एकेक पायरी ते पूर्ण करत असतात. संकल्पना शिकल्यानंतर एकाच प्रकारे सराव करण्याऐवजी वेगवगळ्या खेळातून सराव केला तर मुलं तो न कंटाळता करतात. संकल्पना स्पष्टीकरणाबरोबरच स्नायू विकास, एकाग्रता, वेगळा विचार, तार्किक विचार या बाबींचा विकास देखील या साधनांमधून साधता येतो.

Anchor 1
TUKUHAL
GOSHTIKON
BOLVAANI
CHARIGHACH CHALOKHE
CHARIGHACH CHALOKHE 2
CHARIGHACH CHALOKHE 3
VARSHIK PRAKALP
EDUCATIONAL TOOLS
tilimili
bottom of page