

होम स्कूलिंग
शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी ‘Home Schooling’ हा एक प्रयोग अनेक पालक करून पाहत आहेत. यामध्ये मुलांना शाळेत न पाठवता मुलं घरीच राहून शिकतात. मुलं त्यांची आवड असणाऱ्या विविध विषयांमधील नवेनवे अनुभव घेतात, नवीन गोष्टी शिकतात. परंतु वयाप्रमाणे गरजेच्या संकल्पना आणि क्षमता मुलांनी पूर्ण करणं गरजेचं असत. तसेच मुलाला त्याच्या भावनिक गरजेनुसार गटामध्ये काम करण्याची देखील गरज असते. मुलाला जे करून बघायचं आहे त्याच्या संधी त्याला शोधता येतायत का? वयाप्रमाणे त्याच्या संकल्पना आणि क्षमता पूर्ण होत आहेत ना? त्याला गटामध्ये काम करायची संधी मिळते आहे का? त्याच्या समोर येणाऱ्या अडचणी तो कशाप्रकारे सोडवतो आहे? या गोष्टींकडे सतत लक्ष द्यावं लागतं. मूल जे उपक्रम करणार आहे त्याची रचना कशी असावी? त्याच्या कामाचं मूल्यमापन पालकांनी कस करावं? त्याला त्याच्या कामामध्ये मोकळीक कशी द्यावी? यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्याचं काम स्वार्क या समुपदेशनातून करतं.
पालक समुपदेशन
मुलांमध्ये होणारे बदल, त्याची कारणं, या बदलांप्रमाणे आपल वागण कस असावं याबाबतीत पालकांना अनेक प्रश्न असतात. मुलांचा अभ्यास, त्यांची आवड, त्यांना शिकण्यामध्ये येणाऱ्या अडचणी याविषयी पालकांना जाणून घ्यायचं असतं. या विषयांमध्ये पालकांना मदत करता यावी यासाठी हे समुपदेशन स्वार्कने सुरु केलं आहे. यात मुलांच्या भावनिक, शैक्षणिक, वर्तणुकीशी सबंधित पालकांचे प्रश्न आणि अडचणी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होतो. पालक आणि मुलं यांमधला संवाद अधिक चांगला आणि पारदर्शी कसा होऊ शकतो याकडे लक्ष दिलं जातं. मुलाच्या शिकण्याच्या पद्धतींचा अभ्यास करून कोणत्या माध्यमांमधून त्याला शिकणं आवडतंय आणि ते माध्यम त्याला कसं वापरून बघता येईल याविषयी पालक यातून जाणून घेतात. प्रत्येक मूल वेगळ आहे आणि त्यामुळे आपल्या मुलाला स्वीकारून त्याला योग्य ते वातवरण आणि शिकण्याच्या संधी कशा निर्माण करता येतील याविषयीचं काम या समुपदेशनामध्ये केलं जातं.



